आमचा मोत्या : भाग ३

अगोदर घरात तेरा मांजरं, दोन कुत्री, दोन लेकरं आणि मी. त्यात मला उजवा हात दुखायचा त्रास. मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये दुखावा आहे. जास्त स्वयंपाक होत नाही माझ्याकडुन. स्वयंपाक करताना हातातील बांगड्या काढून ठेवाव्या लागतात. इतक्या मांजरांना नुसतं दुध पुरत नाही. म्हणून पहिली भाकरी किंवा चपाती झाली की ती दुधात कुस्करून ठेवायची म्हणजे त्यांचं पोट भरतं. म्हणून म्हटलं आहेत दोन कुत्री, मोत्याच्या जखमा भरून निघाल्यात. मग तो राहिला तरी ठीक आणि गेला तरी काही हरकत नाही असं म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

आणि एक दिवस खरोखरच मोत्या निघून गेला. सकाळी तुळशीच्या कट्यावर झाडून काढताना तो नव्हता. तेव्हा वाटलं गेटच्या बाहेर टॉयलेटला गेला असेल. नंतर दहा अकरा वाजता प्रविण त्याला जेवण ठेवायला गेला तेव्हा पण तो नव्हता. शेतात सगळीकडे फिरून बघितलं. हाका मारून बघितलं पण कुठेच दिसत नव्हता. दिवसभर करमलं नाही. मन उदास झालं. रात्र झाली तरी मोत्या आला नाही. तुळशीच्या कट्याकडे बघितलं आणि लय रडायला आलं. तो जसाच्या तसा डोळ्यांसमोर दिसायला लागला, खूप वाईट वाटत होतं. मला माझाच राग यायला लागला.

देवाने परत एकदा माझ्या मनात त्याच्यासाठी दया दिली आणि मी मोठ्याने रडायला लागले. अपर्णा, प्रवीणला पण वाईट वाटत होतं. मी पांडुरंगाला मानते. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी हात जोडून उभा राहिले आणि आकाशाकडे बघून म्हटलं, “पांडुरंगा, मला माफ कर, माझ्याकडुन चूक झाली, मी मोत्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं, माझा मोत्या माघारी येऊ दे देवा, मी परत कधीही त्याचा राग राग करणार नाही, गोल्या बॉबी सोबत मी त्याला पण सांभाळीन, त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत तो माझ्या जवळच राहू दे, मी त्याचा कधीही कंटाळा करणार नाही, पण त्याला माघारी आण”.

सारखा मनात त्याचाच विचार. “कुठे गेला असेल ? काय खात असेल ?” दोन दिवसांनी पहाटे मोत्या तुळशीच्या कट्यावर दिसला. आनंदही झाला आणि रडू पण आलं. त्याच्या जवळ जावून डोक्यावरून हात फिरवला. म्हटलं, “इथेच रहा, आता कधीच निघून जाऊ नकोस, नाही तुझ्याकडे दुर्लक्ष करणार”. त्याचा पाय पूर्ण बरा झाला. दोन नखं आली पायाला. गळून पडल्यामुळे पाय आखूड राहिला. म्हणून अजून पण मोत्या लंगडत चालतो. दिवसभर झाडाखाली बसून असतो. गोल्या बॉबी भुंकायला लागले की आपण पण पळतो त्यांच्यामागे भुंकत. शेतात आम्ही काही काम करत असलो की तिथे येऊन बसतो. आम्ही घराकडे आलो की परत झाडाखाली येऊन बसतो.

भाकरी साठी कधीही शेजाऱ्यांच्या घरात गेला नाही. उलट सकाळ संध्याकाळ आम्हालाच त्याला शोधत हाका मारत जावं लागतं. कसलाही हावरटपणा नाही. बाहेर काहीही वाळत घातलं तर त्याला तोंड लावत नाही. कधी कधी तर गोल्याच त्याची भाकरी खाऊन जातो. तरीही तो त्याला भुंकत नाही. माझा जन्मच गुरुवारचा. तिथून पुढे गुरुवारच्याच दोन तीन गोष्टी आश्चर्यकारक घडल्या त्या मी पुढच्या भागात सांगेन.

Leave a Comment