मुलींसमोर शायनिंग मारण्याच्या नादात मार मिळाला

अगोदर मी माझ्या लहानपणीची गोष्ट सांगते. सहा सात वर्षांची असेन मी तेव्हा. माझं गाव लवंग. आमच्या दारात कडुनिंबाचे, चिंचेचं आणि उंबराच अशी तीन मोठी झाडं होती. उंबराच्या झाडाखाली दत्तगुरु आणि नऊनाथ असे एकच फोटोत होते. माझी सावत्र मोठी बहीण ती माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. तिला वडिलांनी पहिल्यांदा त्या फोटोची पूजा कशी करायची ते शिकवलं. मी गेले होते सोबत. अगोदर पाण्याने फोटो धुवून घेतला, दिवा उदबत्ती लावली आणि हातावर अष्टगंध ओला केला. बोटांनी एक एक ठिपका सगळ्या देवांच्या कपाळावर लावला. वडील सांगतील तसं ती करत होती आणि मी बघत होते. शेवटी तिने स्वताच्या आणि माझ्या पण कपाळावर तो गंध लावला. नंतर हात धुतला. तरी पण मेहंदी काढल्यासारखा तिच्या तळहातावर तो गडद डाग उमटला होता. मी पण शाळेत जाताना तोंड धुतलं तरी पण तो डाग गेला नाही. शाळेत मुलींनी विचारलं तू कपाळावर मेहंदीचा ठिपका दिलाय का त्यांना या वयात काय देवपूजा आणि अष्टगंध माहित.

त्या वयात शिक्षण कमी आणि नटापट्टा जास्त. एकमेकींना काहीतरी वाढवून मोठेपणा सांगायची सवय असते. मला पण होती. म्हणून मी नाही सांगितलं तो अष्टगंध आहे. आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे असं सांगायचं होतं मला म्हणून ती नवीन प्रकारची मेहंदी आहे माझ्या वडिलांनी अकलूज वरून आणलीय. ती आपल्या इथे मिळत नाही फक्त अकलूजला च मिळते. माझे वडील अकलूजला कारखान्यात कामाला आहेत. त्यांनी येताना आणली. माझ्या बहिणीने हातावर काढलीय मी आज फक्त कपाळावर ठिपका दिलाय उद्या हातावर काढून येणार आहे. हे ऐकून सगळ्या मुलींना आश्चर्य वाटलं आणि त्यांचं पडलेलं तोंड बघून मला मज्जा वाटत होती. मी मनात ठरवलं उद्या आपणच पूजा करायची म्हणजे बहिणीच्या हातावर जसं मोठा ठिपका उमटलाय तसं माझ्या पण हातावर येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांना विचारलं आज मी देवपूजा करू का ते नको म्हणाले तू अंघोळ केली नाहीस. खरं तर त्यावेळेस मी रोज रोज आंघोळ करत नव्हते. म्हणून बहिणी सोबत गेले तिला गोड बोलून थोडा अष्टगंध हातावर घेतला. ओला करून दोन्ही हाताच्या बोटांना आणि तळहातावर मोठा ठिपका दिला. थोडा वेळ वाळू दिलं आणि झाली मेहंदी तयार. मग काय टायमिंगच्या आधीच मी शाळेत पोहोचले. सगळ्या मुली माझा हात हातात घेऊन बघत होत्या. म्हणायच्या छान आहे मेहंदी आणि वास पण किती छान येतोय. त्यांना काय माहित अष्टागंधाचा वास आहे तो. असं करत चार पाच दिवसांत अष्टगंध संपवला. जेव्हा बहीण वडिलांना म्हणाली पप्पा अष्टगंध संपलाय कुंकू लावू का वडील म्हणाले डबी गच्च भरून अष्टगंध होता लगेच कसा संपला मग तिने माझं नाव सांगितलं ही रोज हातावर लावते. मग काय खोटं पण बोलता येत नव्हतं. हातावर स्पष्टपणे दिसत होतं जोरात दोन तीन चापटा बसल्या. मुलींसमोर शायनिंग मारण्याच्या नादात मार मिळाला.

Leave a Comment