आमचा मोत्या : भाग १

आमच्या घरी न बोलवता अचानक आलेला पाहुणा म्हणजे आमचा “मोत्या”. हे नाव आम्हीच ठेवलं. मला तारीख महिना आठवत नाही. पण त्या दिवशी गुरुवार होता एवढंच आठवतंय.

मोत्या

मला सकाळी साडेपाच सहा वाजता उठायची सवय आहे. मी उठल्यावर घराच्या पाठीमागे अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी गेले. आम्ही चुलीवरंच पाणी गरम करतो. पाण्याच्या टाकी जवळच बेलाचं झाड आहे. मी पाणी आणण्यासाठी गेले तर मला बेलाच्या झाडाखाली हा मोत्या दिसला.

मी सुरुवातीला त्याला बघून घाबरले. मला कुत्र्याची, सापाची आणि मारक्या जनावरांची लय भीती वाटते. प्रविण अजून झोपेतच होता. त्याला हाक मारून बोलावून घेतलं आणि म्हटलं, “ते कुत्रं अगोदर बाहेर काढ”. प्रविण हातात लाकूड घेऊन त्याला हाकलायला लागला. मोत्या जाण्यासाठी उठून उभा राहिला. तेव्हा माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याच्या अंगावर जखमा होत्या. एक पाय गुडघ्यापर्यंत पूर्ण खराब झाला होता. जमिनीवर लोंबत होता. त्यातून पांढरी घाण येत होती.

मोत्याचा रंग तांबडा होता. गळ्यात त्याच्या पट्टा होता. म्हणजे तो अगोदर पाळीव होता. पण तो आजारी पडला म्हणून त्याच्या मालकाने त्याला सोडून दिलं आणि तो आश्रयाला आमच्या घरी आला. त्याच्या अंगावरच्या जखमा बघून म्हटलं, “हे कुत्रं नक्की पिसाळलं असणार. ह्याला लांब हाकलवून लाव”. प्रविण लांबूनच त्याला दगड मारत हाकलवत होता. दगड लागला तरी सुद्धा मोत्या एकदाही त्याला भुंकला नाही. तसाच पाय घेऊन तो सावकाशपणे लंगडत गेटकडे निघाला होता.

मला पहिलं आश्चर्य हे वाटलं की आमच्या घरची दोन कुत्री बॉबी आणि गोल्या हे कधीही दुसऱ्या कुत्र्याला गेटच्या आत येऊ देत नाहीत. मग याला कशी काय गप्प बसली ? का भुंकत नाहीत त्याला ? याचं मला आश्चर्य वाटत होतं. मला माणसांपेक्षा मुक्या प्राण्यांची जास्त दया येते. पण एवढ्या जखमा बघून ते कुत्रं पिसाळलं असेल याची भीती वाटत होती. म्हणून त्याला हाकलून द्यायला सांगितलं. पण त्याला तसं शांतपणे जाताना बघून मनात दया आली. म्हटलं पिसाळलेलं कुत्रं असं शांत नसतं. ते सारखं कुणालातरी चावायला बघतं. मोत्याची तशी लक्षणं दिसत नव्हती. म्हटलं त्याच्या जवळ जाऊन बघुया. भूंकला, अंगावर आला तर हाकलून देवूया नाहीतर त्याच्यावर उपचार करूया.

म्हणून मी सावधपणे त्याच्या जवळ गेले. डोक्यावरून हात फिरवला. मोत्या शांतपणे उभा राहिला. माझी पण भीती पळाली. तो पाळीव होता म्हणून त्याला माझं बोलणं कळत होतं. मी त्याला जनावरांच्या गोठ्यात घेऊन गेले. गोठ्यात जनावरं नव्हती. मोकळाच होता. “इथे बस !” म्हंटल्यावर बसला. लगेच प्रवीणने त्याला दुध, पाणी ठेवलं. खरं तर तो माझ्याकडे बरं होण्यासाठी आला होता. एवढ्या सकाळी डॉक्टर येणार नाहीत. घरात एक तुळशीचा ड्रॉप होता तो मी त्याच्या जखमांवर सोडला.

त्याचं दुसरं आश्चर्य म्हणजे एवढा पाय नासला होता, त्यात अळ्या पडल्या होत्या, पण मोत्याच्या अंगाचा अजिबात वास येत नव्हता. गोल्या, बॉबी जवळ आले तरी त्यांच्या अंगाचा वास येतो. पण मोत्याच्या अंगावर जखमा होत्या पण कसलाही घाण वास येत नव्हता. त्याच्या अंगावर, पायावर ड्रॉप सोडला. मोत्या शांत बसला होता. थोड्या वेळाने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेऊया म्हणून मी अंघोळीला गेले.

Leave a Comment