आमचा मोत्या : भाग २

अंघोळ, चहा, नाश्ता होईपर्यंत दहा वाजल्या. तोपर्यंत गोठ्याकडे कुणीही गेलं नाही. म्हटलं आता डॉक्टरांना फोन करूया. त्यांना फोनवरच सगळी माहिती दिली. ते पण ऐकून सुरुवातीला घाबरले. म्हणाले, “एवढ्या जखमा पिसाळलेलं असेल तर ? मी डॉक्टर असलो तरी मला पण भीती वाटते, मी तुमच्या विश्वासावर येईन पण नाही इंजेक्शन करू दिलं तर ?” मी सांगितलं त्यांना “जाड चादर त्याच्या तोंडावर टाकून प्रविण त्याला धरून बसेल नाही तर तुम्ही इंजेक्शन भरून द्या आणि सांगा कुठं द्यायचं ते आम्ही करू इंजेक्शन पण त्याला बरं करायचं आहे”. डॉक्टर हसले आणि “येतो” म्हणाले.

प्रवीणला सांगितलं, “जुनी एखादी चादर असेल तर घे आणि चल गोठयाकडे”. आम्ही तिथे गेलो तर मोत्या तिथे नव्हता. त्याने बसलेल्या जागेवर त्याचा खराब पाय गळून पडला होता. पांढऱ्या अळ्या होत्या तिथे. म्हटलं कुत्रं कुठं गेलं ? प्रवीणला शेतात सगळीकडे फिरून बघ असं सांगितलं आणि मी गेटकडे पळत आले. वाटलं निघून गेला की काय ? सगळीकडे बघून घरासमोर आले तर तो तुळशीच्या कट्यावर झोपला होता.

आमच्या घराला दोन दरवाजे आहेत. पुढचा दरवाजा सारखा बंद असतो. तुळशीच्या कट्यावर ऊन पडलं होतं. तरीही तो सावलीतून उठून ऊन्हात येवून झोपला होता. डॉक्टर आले. ते म्हणाले, “इंजेक्शन केल्यावर जखमा बऱ्या होतील पण पायाने हा लंगडाच राहील, पाय गळून पडलाय, नवीन पाय येणं शक्य नाही”. इंजेक्शन घेऊन डॉक्टर तुळशीच्या पाठीमागून हळूच त्याच्या जवळ गेले. इंजेक्शन देताना मोत्याने शांतपणे मान वळवुन त्यांच्याकडे बघितलं आणि परत झोपी गेला.

चावायचं तर लांबच भुंकला सुद्धा नाही. डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, “मी पण असं कुत्रं पहिल्यांदा बघितलंय इंजेक्शन करताना गप्प बसलेलं, तुमची दोन्ही कुत्री मला बघितलं की पळून जातात आणि हे अनोळखी असून गप्प बसलंय, आश्चर्य आहे”. त्यांनी जखमांवर टाकायला एक स्प्रे दिला आणि म्हणाले, “आज मी तुमच्याकडून पन्नास रुपये कमी घेणार आहे, मला पण काही तरी पुण्य मिळू द्या, तुमचं कुत्रं नसताना तुम्ही त्याच्यासाठी एवढं करताय मग मी पण पन्नास रुपये कमी घेतो”.

प्रवीणने त्याच्या अंगावर, पायावर स्प्रे टाकला. त्याचं दुसरं आश्चर्य त्याने कधीही दारासमोर शेतात घाण केली नाही. लंगडत पाय घेऊन तो टॉयलेटला गेटच्या बाहेर जायचा आणि दिवसभर कितीही ऊन लागलं तरी पण तो तुळशीच्या कट्यावरच झोपायचा. तुळशीला कट्टा आहे. पण त्यावर फरशी नाही. आम्ही सारवून काढतो. काय ठेवलं ते खायचा. स्प्रे मारताना पाय वर करायचा. जसं की त्याला सगळं माहीत होतं ह्या स्प्रे मुळे आपली जखम बरी होईल.

त्याने मला कसलीही तक्रार दिली नाही. पाणी, जेवण आपण देईल तेंव्हाच खायचा. पाणी प्यायचा आणि झोपायचा. त्याच्याकडे बघितलं की काहीतरी वेगळंच आहे असं वाटायचं. त्याच्या गळ्यातला पट्टा काढून टाकला. आता बरं होईपर्यंत तो इथेच राहणार म्हणून त्याचं नाव ठेवलं मोत्या. खूप दिवस लागले त्याच्या जखमा ठीक व्हायला. तोपर्यंत दोन टाईम त्याची व्यवस्थित काळजी घेतली. आणि तो ठीक होईल तसं माझं त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.

Leave a Comment