त्या वेळेस घरीच सगळ्या वस्तू विकायला यायच्या. कपडे, भांडी, फुगे, मेकअपचं सामान. एक बम्बई मिठाईवाला येत होता. केसांवर मिठाई द्यायचा. हातावर घड्याळ, मोराची डिझाईन काढून द्यायचा. अगोदर मी सगळ्यांना दाखवायचे मग खायचे.
एकदा मोठी फजिती झाली. रोज वेणी घालावी लागतेय म्हणून आईने माझे केस कापले. त्यादिवशी मी खूप खूश होते की माझ्याकडे भरपूर केस आहेत मग जास्त मिठाई येणार. मी ती सगळी केसं फ्रॉकच्या ओटीत भरली आणि मिठाईवाल्याकडे गेले. त्याने सांगितलं अशी केसं चालत नाहीत दुसरी केसं आण.
मी म्हणायचे, का चालत नाहीत ? ही पण केसंच आहेत. तो म्हणाला केस विंचरताना कंगव्यातून निघालेली केसं आण. परत मी माघारी आले. रोज कुठून केसं आणणार. मग मी आजीच्या झोपडीवर गेले. केसं गोळा केली आणि पळत सुटले. तोपर्यंत तो माणूस लांब गेला होता.
परत तेच घडलं. तो माणूस म्हणाला, पांढरी केसं चालत नाहीत काळी केसं पाहिजेत. मी विचारले आता केसं नाहीत पैसे घेऊन येऊ का ? तो हो म्हणाला. मी पळत घराकडे सुटले. आईला पैसे मागितले. ती देत नव्हती म्हणून मी रडायला लागले. म्हणून तिने फाटकी नोट माझ्या हातात ठेवली. तोपर्यंत तो माणूस अजून जास्तच लांब गेला होता. त्याने नोट उघडून बघितली तर नोट फाटकी होती.
त्याला माझी दया आली. त्याने पैसे न घेता माझ्या एका हातावर घड्याळ आणि दुसऱ्या हातावर मोर काढून दिला आणि सांगितले केसं जमा झाली की आणून दे. अगोदर फजिती झाली नंतर मी खुश झाले.